अर्थमंत्र्यांच्या बैठकीला मंत्री तटकरेंची हजेरी; आ. दळवी, आ. थोरवेंची आदळाआपट
| रायगड | खास प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद महायुतीत अद्यापही कायम आहे. त्यातच मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या दालनात रायगड जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी हजेरी लावली होती. मात्र, रायगड जिल्ह्यातील शिवसेनेसह भाजपाच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आले नव्हते, तर मंत्री भरत गोगावले हे गैरहजर होते. 2025-26 साठीच्या सुमारे 366 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली असून, लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिली.
अशातच आता या बैठकीवरुन शिंदे गटाच्या आमदारांनी आदळाआपट सुरु केली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैठकीला निमंत्रित केले नसल्याचे कारण पुढे करत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महायुती सरकारमधील घटक पक्ष असणार्या शिंदे गटाला चेपण्यात येत असल्याचे यावरुन दिसून येते. त्यामुळे आगामी कालावधी शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये राजकीय कुरघोडीला उधाण येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आमदार दळवी आणि आमदार थोरवे हे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार होते. मात्र, त्याआधीच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
आमदारांनी त्यांच्या भागातील ज्या काही सूचना असतील, त्या त्यांनी द्यावात. त्या मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अर्थसंकल्पात घेऊ, असे त्यांनी म्हटले. तर, आज रायगडच्या जिल्हा नियोजनासंदर्भात बैठक झाली. पालकमंत्र्यांचा वाददेखील लवकर मिटेल, असेदेखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेवरुन शिंदेदेखील हतबल असल्याचे दिसून आले. आगामी कालावधीत जिल्ह्याच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेस, विशेष म्हणजे तटकरे कुटुंबाचाच वरचष्मा राहणार असल्याचे बोलले जाते. मंत्री भरत गोगावले यांना सदरच्या बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सदरची बैठक बोलावली होती. त्यांना तसा अधिकार आहे. त्यांनी जिल्ह्यातील दोन्ही मंत्री म्हणजे आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांना आमंत्रित केले होते. जिल्हाधिकारी यांना सदरच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आदेश होते.
जयसिंग मेहेत्रे,
जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या गडकिल्ले धारातीर्थ मोहिमेचा सांगता समारंभ रायगडवर पार पडला. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने बैठकीला फक्त जिल्ह्यातील मंत्र्यांनाच आमंत्रण होतं.
भरत गोगावले,
शिंदे गटाचे मंत्री