| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातल्या मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आता मोठी कारवाई झाली आहे. महाड पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि.1) दुपारी पंकज फोटो स्टुडिओमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हल्लेखोरांनी दुकानात घुसून उमासरे यांना बेदम मारहाण केली, तसंच दुकानातील वस्तूंची तोडफोड केली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे मारहाण प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राजकीय टीका टिपणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी सोशल मीडियावर रोजगार हमी उत्पादन मंत्री गोगावले यांच्यावर वैयक्तिक टीका टिपणी केली होती.
या गोष्टीचा राग मनामध्ये धरून शिवसेना शिंदे गटाच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांनी पंकज उमासरे यांच्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांच्या चवदार तळे येथील पंकज प्रेम मास्टर व फोटो स्टुडिओ या दुकानात येऊन पंकज उमासरे यांना लाथा बुक्क्यांनी व हाताच्या ठोशाने मारहाण केली. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. मारहाणीचे वृत्त समजल्यानंतर पोलिसांनी पंकज उमासरे यांना प्रथम महाग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर एमआरआय करण्यासाठी माणगाव रुग्णालय येथे नेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह रोहन धेडवाल, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, सौजन्य कानेकर ,भावड्या सुर्वे, निरज खेडेकर, सुनंदा पवार यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे तपास करीत आहेत.





