| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पालीतील अवैध व अवजड वाहतूक सर्वात गंभीर समस्या बनली आहे. येथील अवैध वाहतूक बंद व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
पाली शहरातून होणारी अवैध व अवजड वाहतूक, जीवघेणी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी डंपर वाहतुकीत गुरे चिरडली होती. या अपघाती घटनेनंतर येथील अवजड व अवैध वाहतुकीचा मुद्दा चांगलाच पेटला होता. या प्रश्नावर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत पाली शहरातील अवैध व अवजड वाहतूक बंद न झाल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर व महिला जिल्हा सचिव लता कळंबे यांनी प्रशासनाला दिला.
यावेळी पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांना मनसेच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले. या संदर्भात पाली नगरपंचायत विभागाला पत्रव्यवहार व चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही तहसीलदार कुंभार यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, मनसे महिला जिल्हा सचिव लता कळंबे, तालुकाध्यक्ष सुनिल साठे, अजय अधिकारी, दीपेश लहाने, भावेश बेलोसे, अजिंक्य पाशीलकर, तेजेश परबलकर, शेखर चव्हाण, प्रतीक आंग्रे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.