। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माथेरान महावितरण विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने सातत्याने वीज गायब होणे, कमी दाबाने वीज पुरवठा व पावसाळ्यापूर्वी विजेची कामे त्वरित हुडकून घ्यावी या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
माथेरान मनसेतर्फे येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यांच्या माथेरानमध्ये सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा, वीज वितरणाच्या कामांमध्ये केली जाणारी दिरंगाई, कमी दाबाने होणारा वीज पुरवठा या महत्त्वाच्या मागण्या होत्या. यावेळी माथेरान महावितरण अभियंता सचिन आटपाटकर यांनी आंदोलनकर्त्यांना प्रस्तावित कामांची यादी सादर केली. ज्यामध्ये माथेरानमधील प्रस्तावित विविध कामांची माहिती देण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचे समाधान झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी माथेरान मनसे शाखेचे अध्यक्ष संतोष कदम, भूषण सातपुते, सूरज कळंबे, ॠषिकेश केळगणे, असीफ खान, रजनी कदम, शिवाजी सुतार आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.