10 लाखांचे मोबाईल मूळ मालकांना परत
| पनवेल | प्रतिनिधी |
गहाळ आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत देण्याची कामगिरी पनवेल गुन्हे शाखा कक्ष 3 ने केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे 100 हून अधिक मोबाईल शोधण्यात आले असून, भाऊबीजेच्या निमित्ताने पहिल्या टप्प्यात 40 नागरिकांना सुमारे 10 लाख रुपये किमतीचे मोबाईल परत करण्यात आले. सणासुदीच्या काळात मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गहाळ मोबाईलच्या तक्रारींचा तपास हाती घेतला होता. मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि सायबर तपासाच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून हे मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले. भाऊबीजेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात 40 तक्रारदारांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. अनेक दिवसांपासून गहाळ असलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यांनी पोलीस अधिकारी आणि तपास पथकाचे आभार मानले. दरम्यान, पोलिसांनी शोधलेल्या उर्वरित मोबाईलच्या मूळ मालकांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील टप्प्यात हे मोबाईलही संबंधित नागरिकांना परत करण्यात येणार आहेत. गुन्हे शाखेच्या या कामगिरीमुळे नागरिकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळाला आहे.






