निकृष्ट फोनमुळे माहिती अपलोड करण्यात अडचणी ; नवीन मोबाईलची मागणी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले पॅनासोनिक कंपनीचे मोबाईल वापरण्यास निकृष्ट आणि नवीन अपलोड केलेले पोषण अॅप हे इंग्रजीमधून असल्याने सेविकांना कामात अडचणी येत आहेत. अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी अलिबाग पंचायत समिती कार्यालयात असलेल्या आयसीडीसीच्या प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांना आपले मोबाईल परत करून आंदोलन केले.
याबाबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलीक यांच्याकडे अलिबाग तालुका प्रमुख जिविता पाटील यांच्या नेतृत्वाखालील अंगणवाडी सेविका शिष्टमंडळाने निवेदन दिले. आम्हाला नवीन मोबाईल द्या, अॅप मराठीमधून द्या आणि रजिस्टर द्या अशी मागणी निवेदनामार्फत अंगणवाडी सेविकांनी शासनाकडे केली आहे.
अंगणवाडी सेविकाचे काम सुलभ आणि जलद व्हावे यासाठी शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविकांना 2019 साली पॅनसोनिक कंपनीचे मोबाईल दिले होते. तसेच सिमकार्डसोबत मोबाईल रिचार्ज खर्चही शासनामार्फत दिला जात होता. अंगणवाडी सेविकांना मोबाईलमध्ये पोषण ट्रेकर अॅप देण्यात आले होते. या अॅपमध्ये मराठीत पोषण आहार, मुलांची, स्तनदा माता, लसीकरण, सर्व्हे याची माहिती भरली जात होती. त्यामुळे काम सोपे झाले होते. मात्र, काही दिवसांनी मोबाईलला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने ते बंद पडू लागले. अनेक अंगणवाडी सेविकांनी स्वतः 2 ते 3 हजार रुपये खर्च करून रिपेअर करून घेतले. मात्र, तुटपुंज्या मानधनामुळे हा खर्च सेविकांना परवडणारा नाही.
पोषण ट्रेकर अॅपमध्ये बदल करण्यात आला असून, हे अॅप आता इंग्रजीमध्ये केले आहे. त्यामुळे सर्व माहिती आता इंग्रजीमध्ये भरावी लागत आहे. अनेक अंगणवाडी सेविकांचे शिक्षण कमी असल्याने इंग्रजीत माहिती भरणे कठीण जात आहे. अंगणवाडी सेविका काम करताना महत्त्वाचे म्हणजे त्यांना गावाचा सर्व्हे करून माहिती घ्यावी लागते आणि ती माहिती अॅपमध्ये भरावी लागते. मात्र, नवीन अॅपमध्ये सर्व्हे ऑप्शन दिला नसल्याने माहिती अपूर्ण राहात आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अडचणी निर्माण होत आहे.
शासनाने दिलेला पॅनेसोनिक मोबाईल वापरण्यास निकृष्ट असून, खर्च परवडणारा नाही. त्यामुळे आम्ही हा मोबाईल प्रशासनाकडे परत करीत आहोत. मोबाईल वापरण्यास अंगणवाडी सेविकांची कोणतीही अडचण नाही. मात्र, पोषण ट्रेकर अॅप हे मराठीत करावे, शासनाने नवीन मोबाईल द्यावे, रजिस्टर द्यावे, या प्रमुख मागण्या सेविकांच्या आहेत. अंगणवाडी सेविकांनी मोबाईल प्रशासनाकडे परत दिल्याने पुन्हा या सेविकांना रजिस्टरवर माहिती भरून सादर करावी लागणार आहे. महिला व बालकल्याण प्रकल्प संचालक गीतांजली पाटील, विस्तार अधिकारी अपर्णा शिंदे, अपेक्षा म्हात्रे आदी उपस्थित होत्या.