महामार्गावर मोकाट गुरांचा सुळसुळाट

। सुकेळी । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर तसेच वाकण-पाली मार्गावर मोकाट गुरांचा सुळसुळाट असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महामार्गावरील वाकण पुलावर तर दिवसाढवळ्या तसेच रात्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा वावर पहायला मिळतो. जणु काही या गुरांनी रस्त्यावर रास्ता रोकोच केला आहे. रस्त्यावरील वाढत्या मोकाट गुरांच्या वाढत्या संख्येमुळे वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या मोकाट गुरांच्या दिवसेंदिवस वाढत्या संख्येमुळे या गुरांना कोणी वाली आहे कि नाही? ही गुरे रस्त्यावर अशीच मोकाट सोडून देण्यात आलीत की काय? असा प्रश्‍न उभा राहिला आहे. या गुरांचे कळपच्या कळप रस्त्यावर उभे राहिलेले असतात. त्यांच्यामागे कोणीही गुराखी वैगरे दिसून येत नाही. तसेच वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ताच मोकळा नसल्यामुळे गाडीचा हॉर्न वाजवुन सुद्धा गुरे बाजुला होत नसल्यामुळे शेवटी वाहनचालकांना गाडी उभी करुन गाडीतुन उतरून गुरांना बाजुला करावे लागत आहे. ही गुरे ज्यावेळी रस्त्यावर मोकाट फिरत असतात त्यावेळी यांचा कोणीच मालक नसतो. पंरतु वाहनाची जर का चुकून एखाद्या गुराला धडक बसून अपघात घडतो त्यावेळी मात्र अनेक जण मी या गुरांचा मालक असल्याचे सांगत असतात.

तसेच या उनाड गुरांच्या रस्त्याच्या मधोमध बरेच वेळा झुंज होत असतात. या झुंजीमुळे अनेक गाड्यांना अपघात होऊन गाडीचे शो, क्लज, इंडिकेटर पुर्णपणे तुटुन वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना बर्‍याच वेळा घडल्या आहेत. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात फिरणार्‍या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन चलकांतून होत आहे.

Exit mobile version