अलिबागमध्येही सावकारी; व्याजाचे पैसे मिळविण्यासाठी कामगाराला मारहाण

प्रवीण रनवरेविरोधात गुन्हा दाखल; राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

पेण तालुक्याबरोबरच आता अलिबागमध्येही खासगी सावकारांनी उच्छाद मांडला असल्याचे समोर आले आहे. खासगी सावकार गरजवंतांचे शोषण करीत आहेत. पेणमध्ये अशाच पद्धतीने सावकारांनी गरजवंतांच्या मुंड्या मुरगाळल्याची प्रकरणे चव्हाट्यावर आली असतानाच आता गेल्याच आठवड्यात अलिबागमध्येही सावकारीचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. अलिबागमधील प्रवीण रनवरे यांनी व्याजाने दिलेले एक लाख रुपये मिळविण्यासाठी समाधान तायप्पा यमगर या माथाडी कामगाराला बेदम मारहाण केली. त्यामुळे घाबरुन गेलेल्या त्या कुटुंबियांनी रनवरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, वारंवार गुन्हे दाखल होऊनही तालुक्यातील खासगी सावकारी थांबत नसल्याने नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

समाधान यमगर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रवीण रनवरे यांच्याकडून 3.5 टक्के व्याजदराने एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. दर महिन्याला ते रनवरेंना 3 हजार 500 रुपये व्याज देत होते. मात्र, घरगुती अडचणीमुळे त्यांना तीन महिने व्याज देणे शक्य झाले नाही. त्यामुळे रनवरे यांच्याशी बोलून यमगर यांनी सुरक्षेसाठी त्यांना दोन चेक दिले. 7 फेब्रुवारी रोजी रनवरे व त्यांचा मित्र मुकेश हे फिर्यादींच्या घरी गेले. त्यावेळी महिन्याभरात पैसे देण्याचे फिर्यादीने कबूल केले. मात्र, रनवरे यांनी पैसे घेताना मध्यस्थी करणारे दत्तात्रेय सीताराम फदाले यांच्या घरी समाधानला नेले. मात्र, फदाले घरी नसल्यामुळे आरोपींनी समाधानला कुरुळमार्गे वेश्‍वी दत्त मंदिर या निर्जन मार्गावर नेऊन बेदम मारहाण व शिवीगाळी करुन तेथून पळ काढला.

…एचआयव्हीचे इंजेक्शन देईन
व्याजाने दिलेले पैसे मिळविण्यासाठी प्रवीण रनवरे व त्याचा मित्र मुकेश यांनी समाधानला बांधून ठेवले. तसेच हाताबुक्क्याने बेदम मारहाण केली. याशिवाय जर पैसे दिले नाही, तर एचआयव्हाचे इंजेक्शन देण्याची धमकी दिली. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून पाठीमागून गाडी येत असल्याचा आवाज येताच दोघांनी तिथून पळ काढला आणि समाधान बचावले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
बेकायदेशीर सावकारी करणार्‍यांमध्ये अनेक व्हाईट कॉलरवाल्यांचा समावेश असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांनी दलाल नेमले असून, सावज शोधून त्याला सावकाराच्या दारात उभे करण्याचे काम दलाल करतात. त्यातून त्यांना कमिशन मिळते. अलिबागमधील रनवरे यांनीदेखील सावकारीप्रमाणे कामगाराला कर्ज दिल्याची चर्चा आहे. मात्र, पोलीस विभाग तसेच राजकिय क्षेत्रातही त्यांची ऊठबस असल्यामुळे पोलीस नेमकी काय कारवाई करणार, याकडे सार्‍यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

आरसीएफ कंपनीत कामाला असल्यापासून रनवरे यांची ओळख होती. यापूर्वीदेखाील पैसे व्याजाने घेतले होते. मात्र, ते फेडले होते. यावेळी थोडा उशीर झाला. नातेवाईक घाबरल्यामुळे पोलिसांनी आरोपीची गाडी जप्त केली असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच वैद्यकीय अहवालाबाबत काही माहिती नाही.

समाधान यमगर,
तक्रारदार

Exit mobile version