वरसोलीत वानराची दहशत

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

पाळीव जनावरांवर हल्ले, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।

नागाव-आक्षी परिसरातील बिबट्याच्या दहशतीनंतर अलिबाग तालुक्यातील वरसोलीमध्ये एका वानराने दहशत निर्माण केली आहे. गावातील बाबदेव आणि परिसरातील पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना जखमी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये एका आठ वर्षाच्या वासराचा मृत्यू झाला असून म्हैस गंभीर जखमी झाल्याचे समजते. वरसोलीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरसोली येथील बापदेव आळी परिसरात गेल्या आठवड्यापासून वानराचा वावर आहे. झाडांवर लपून बसणे, त्यानंतर संधी मिळताच गुरांच्या गोठ्यात शिरून बांधलेल्या जनावरांना हल्ला करणे हा प्रकार सुरु आहे. पाळीव प्राण्यांच्या तोंडावर, नाकाजवळ तसेच शरीराच्या इतर भागांवर मोठमोठे चावे घेत आहे. या हल्ल्यांमुळे दहशतीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.

वरसोलीमधील प्रशांत दत्तात्रेय वर्तक यांच्या म्हशीचे अवघ्या आठ दिवसाचे रेडकू या वानराच्या हल्ल्यात ठार झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतरही वानराचा उपद्रव थांबलेला नाही. गुरुवारी सकाळी देखील वानराने पुन्हा हल्ला केला. गोठ्यांतील म्हशींना लक्ष्य करत त्यांच्या तोंडावर आणि नाकाजवळ मोठमोठे चावे घेतले. गोठ्यातील एक म्हैस आणि दोन रेडकूनवरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाळीव जनावरांवर हल्ले करणाऱ्या या वानराच्या आक्रमक वर्तनामुळे आता मानवी सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून, संबंधित वन विभाग आता काय उपाययोजना करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

जखमी जनावरांवर उपचार सुरू
वानराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाळीव जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र या जनावरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
Exit mobile version