एसटी महामंडळाच्या रायगड विभागाकडून नियोजन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
होळी आणि धुलिवंदन सणानिमित्त रायगडसह संपूर्ण कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या रायगड विभागाने विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. महाड, माणगाव, श्रीवर्धनसह विविध आगारांतून बुधवार आणि गुरुवारी परतीसाठी ज्यादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक कार्यालयाने दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरूड, रोहा, माणगाव, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर आदी तालुक्यांतील अनेक नागरिक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, बोरीवली, नालासोपारा अशा ठिकाणी स्थायिक आहेत. गणेशोत्सवासोबतच होळीच्या सणालाही हे चाकरमानी आवर्जून गावी येतात. कुटुंबीय व ग्रामस्थांसमवेत ते मोठ्या उत्साहात होळी व धुलिवंदन साजरे करतात.
सोमवारी (दि.2) होळीचा सण उत्साहात पार पडला. पारंपरिक खेळ, नृत्य, गप्पागोष्टी यांचा आनंद ग्रामस्थांनी लुटला. मंगळवारी धुलिवंदनानिमित्त रंगांची उधळण करण्यात आली. गावोगावी पालख्या काढून सण साजरा करण्यात आला. आता बुधवारी (दि.4) व गुरुवारी (दि.5) अनेक चाकरमानी परतीच्या मार्गावर निघणार असल्याने प्रवाशांची गर्दी अपेक्षित आहे. दरम्यान, शनिवारपासून सलग चार दिवस सुट्टी आल्याने पर्यटकांचीही जिल्ह्यात मोठी वर्दळ आहे. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांसह पर्यटकांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी रायगड विभागाने अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे.
महाड आगारातून बोरीवली, भांडूप, नालासोपारा मार्गावर बसेस सोडण्यात येणार आहेत. माणगाव आगारातून मुंबई व बोरीवलीकडे तर श्रीवर्धन आगारातून नालासोपारा व बोरीवलीपर्यंत विशेष बसेस धावणार आहेत. सकाळी साडेसहा, पावणे सात, आठ, सव्वा नऊ, पावणे नऊ, सव्वा दहा तसेच दुपारी एक वाजता या बसेस सुटतील, अशी माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
विनाथांबासह 27 गाड्यांचे नियोजन
चाकरमान्यांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेत पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळ रायगड विभाग नियंत्रक कार्यालयाने विना थांबा (एक्स्प्रेस) बसेससह थांबा घेणाऱ्या शटल बसेसचीही व्यवस्था केली आहे. महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरूड आणि माणगाव या आगारांतून एकूण 27 अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज
महाड-पनवेल, अलिबाग-पनवेल, पेण-पनवेल, पेण-खोपोली, पेण-नागोठणे, पेण-अलिबाग, श्रीवर्धन-पनवेल, कर्जत-अलिबाग, रोहा-पनवेल, मुरूड-अलिबाग, मुरूड-पनवेल तसेच माणगाव-पनवेल या मार्गांवर विशेष बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत. याशिवाय ठाणे, बोरीवली आणि मुंबई मार्गावरील नियमित फेऱ्या रद्द न करण्याच्या स्पष्ट सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे.
