आई व मुलाचा बुडून मृत्यू

। चिरनेर । प्रतिनिधी।

कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईचा व तिच्या सात वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उरण तालुक्यातील पिरकोन गावात रविवारी (दि.9) ही दुर्दैवी घटना घडली असून, तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

उरण तालुक्यातील पिरकोन गावातील निरा जगदीश पाटील (25) या त्यांचा मुलगा रिहान पाटील याला सोबत घेऊन, त्या तळ्याकाठी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. निरा पाटील या कपडे धुवत असताना रिहान याचा पाय पाण्यात घसरला आणि रिहानला पाण्यात पडल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी आई निरा पाटील यांनी देखील पाण्यात उडी घेतली. त्यानंतर दोघेही पाण्यात बुडाले. रविवारी संध्याकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेली नीरा पाटील आणि त्यांचा मुलगा रिहान पाटील संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने निरा पाटील यांचे सासरे जयवंत नामदेव पाटील हे तळ्याकडे पहाण्यासाठी गेले असता, त्यांना निरा व रिहान तळ्याकाठी न दिसल्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. मात्र, त्यांना नीरा आणि रिहान न दिसल्यामुळे, काही वेळाने त्यांनी शोधकार्य सुरू केले. शोधकार्यात त्यांना तळ्यात निरा पाटील आणि रिहानचा मृतदेह आढळून आला.

Exit mobile version