| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील अंगणवाडीत अडीच वर्षांच्या मुलीला रडत असल्याच्या रागातून आईने आंगणवाडीच्या प्रवेशद्वारावरच लाथ मारल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. त्यानंतर संबंधित आईची चौकशी करण्यात आली असून, बालिकेची वैद्यकीय तपासणी करून तिला आईसह बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने समाजमाध्यमांवर चित्रफीतीव्दारे आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.
ही घटना गुरूवारी (दि.25) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील अंगणवाडीत घडली. अडीच वर्षांच्या मुलीला प्रथमच अंगणवाडीत आणल्यानंतर ती सतत रडत होती. तिचे रडणे पाहून वर्गातील इतर मुलेही रडू लागल्याने आईचा संयम सुटला. मुलीला बाहेर नेऊन शांत करण्याऐवजी तिने रागाच्या भरात तिच्या पोटच्या मुलीला लाथ मारल्याचे चित्रफीतीमध्ये दिसून आले. घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. त्याचबरोबर अंगणवाडीतील परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही काहींनी प्रश्न उपस्थित केले. बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकरण बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले आहे. समितीच्या मान्यतेनंतर आईच्या स्वाधिन बालिकेला करण्यात आले. पोलीस सोमवारी या प्रकरणाचा अहवाल समितीसमोर मांडणार असल्याचे पोलीस अधिकारी ठाकरे यांनी सांगीतले. त्यानंतर पुढील कार्यवाही समितीच्या अहवालानुसार केली जाणार आहे.
लाथेने मारल्यानंतर आईची माफी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606