कळंबोली येथील अंगणवाडी क्रमांक 55 येथील घटना
। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
अंगणवाडीमधील बालकांना दिल्या जाणार्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या निघाल्याची धक्कादायक घटना कळंबोली वसाहतीत घडली आहे. वसाहतीतील सेक्टर 5 ई परिसरातील अंगणवाडी क्रमांक 55 मध्ये हा प्रकार आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त करत संबंधीत विभागाकडे तक्रार केली आहे.
या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्यालाही धोका असल्याचे स्पष्ट होत असून, पोषण आहाराची जबाबदारी असलेल्या महिला बचत गटाच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासन निर्देशानुसार विविध भागात सुरु असलेल्या अंगणवाड्यांमध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासह पोषण आहाराचे नियमित वितरणही केले जाते. या ठिकाणी पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी नवी मुंबईतील नेरुळ येथील महिला बचत गटाकडे देण्यात आली आहे. बुधवारी देखील अंगणवाडी क्रमांक 54 या ठिकाणी नेहमीप्रमाणे बालकांना पोषण आहारात रव्यापासून तयार करण्यात आलेल्या उपीट वाटप करण्यात आले होते. यावेळी काही बालकांनी आहार खाल्ला तर काही बालकांनी आहार घरी नेला. शालेय पोषण आहार घरी नेल्यानंतर अंगणवाडीतील एका बालिकेच्या आहारात अळ्या असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले.
पालकांनी तात्काळ या बाबतची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकारी स्नेहल बागल यांना कळवली. बागल यांनी तात्काळ अंगणवाडीत पोहचून तेथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना याबाबत जाब विचारत संताप व्यक्त केला. तसेच थेट एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकार्यांकडे या प्रकाराची तक्रार केली.
बालकांना उलटीचा त्रास
मनसेच्या महिला आघाडीच्या नेत्या असलेल्या बागल या देखील घटना घडलेल्या अंगणवाडी परिसरात वास्तव्यास असून, त्यांचेही बाळ अंगणवाडीत जाते. अंगणवाडीत वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराचे सेवन केल्याने बागल यांच्या बाळाला उलट्या झाल्याचे बागल यांचे म्हणणे आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळताच आमच्या विभागाचे कर्मचारी चौकशी करण्यासाठी अंगणवाडीत पाठवण्यात आले असून, त्यांनी दिलेल्या माहितीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
सुहिता ओव्हाळ,
अधिकारी, बालविकास प्रकल्प, कळंबोली