धक्कादायक! आधी मुलीला 29 व्या मजल्यावरून खाली फेकले, मग आईनेही मारली उडी

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पोटाच्या आठ वर्षांच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून खाली फेकले आणि त्यानंतर स्वत: देखील उडी मारली. या घटनेत दोघींचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पनवेलमधील पळस्पे फाटा येथे मॅराथॉन नॅक्सॉन या उच्चभ्रू इमारतीत 29 व्या मजल्यावरील सदनिकेत आशिष दुवा आपल्या पत्नी आणि मुलीसह राहत होते. आशिष यांची पत्नी मैथिली (37) या काही काळापासून मानसिक तणावाखाली होत्या असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मैथिली यांनी आपली आठ वर्षीय मुलगी मायरा हिला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकले. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच मैथिली यांनी स्वतः उडी मारून आत्महत्या केली.

मैथिली यांच्या पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मैथिली यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आशिष आणि मैथिली यांचा प्रेमविवाह होता. आशिष मूळ आग्रा येथील असून त्यांचा कंत्राटी व्यवसाय आहे, तर मैथिली या गृहिणी होत्या. काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. आशिष झोपेत असताना मैथिली यांनी आपल्या खोलीची कडी लावली आणि मुलीला आधी खाली फेकले. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version