। ठाणे । प्रतिनिधी ।
मद्यधुंद तरुणांनी पोलिसावरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भर रस्त्यात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदारावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
भाईंदर पश्चिमेतील शिवसेना गल्ली परिसरात शुक्रवारी (दि. 14) दुपारी दोन तरुण रस्त्यातच वाद घालत होते. यावेळी त्याच भागात गस्त घालत असलेले पोलीस हवालदार काशिनाथ भानुसे यांनी हा वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप केला. मात्र, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यातील एका तरुणाने भानुसे यांना जोरदार धक्का दिला, तर दुसऱ्याने खिशातून चाकू काढून त्यांच्या पोटावर वार केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे भानुसे गंभीर जखमी झाले. हल्ला करून दोन्ही तरुण घटनास्थळावरून पळून गेले.
तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी भानुसे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या उपचार सुरु आहेत. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दखल करून आरोपी कमलेश गुप्ता आणि दिलीप खडक यांना अटक केली आहे. दोन्ही आरोप मद्यधुंद अवस्थेत होते असे भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सांगितले.