वर्णे-नांगुर्ले-तिघरवासियांचे श्रद्धास्थान आई वरणाई माता

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वर्णे-नांगुर्ले-तिघर या कर्जत – खोपोली रस्त्यावरील डोंगराच्या बाजूला असलेली तीन गावे आणि या गावातील ग्रामस्थांची ग्रामदेवता म्हणून तेथील वरणाई माता सर्वांसाठी श्रद्धास्थान बनली आहे.

शारदीय नवरात्रौत्सव असल्याने ठिकठिकाणी देवींच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होत आहे. दोन वर्ष कोरोनाच्या सावटा नंतर या वर्षी उस्फूर्तपणे भक्त ठिकठिकाणी दर्शनासाठी जात आहेत. गावाच्या परिसरात गावदेवीची मंदिर बर्‍याच गावा मध्ये आपणास पाहायला मिळतात. त्या त्या गावाची वेगवेगळी अख्यायिका स्थानिक सांगत असतात.

कर्जत-पळसदरी मार्गे खोपोली रस्त्यालगत असलेल्या वर्णे, नांगूर्ले, तिघर या गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात गावदेवी वरणाई मातेच प्राचीन मंदिर आहे. देवीची मूर्ती खुप प्राचीन काळातील असून मंदिर परिसरात पांडवकालीन खुणा आढळतात. आजूबाजूला झाडांची गर्दी आणि लाल मातीच्या पायवाटेने गेल्यावर वरणाई देवीचे मंदिर नजरेस पडते. मंदिराच्या मागील बाजूस डोंगर कुशीत पांडवकालीन गुहा आहेत. तेथील भागात पिण्यायोग्य पाण्यासाठी जमिनीच्या अंतर्गत खोदून पाण्याचे टाके (हौदाच्या आकाराचे) दगडामध्ये दिसतात. त्यामध्ये बारमाही पाणी आजही पाहायला मिळते. जागृत देवी असल्याने परिसरातील भक्तगण येथे दर्शनासाठी गर्दी करत आहेत. परिसरातील माहेरवाशिणी सुद्धा नवरात्रीत आवर्जून दर्शनासाठी येत असतात. देवी नवसाला पावते आणि भक्तांच रक्षण करते अशी येथील भक्तांची धारणा आहे.

पुढील काळात मंदिरासाठी सुसज्ज रस्ता तयार होत असून मंदिरासाठी एक एकरच्या आसपास राखीव असलेल्या जागेस बंदिस्त कंपाऊंड, पाण्याची व्यवस्था, वृक्षलागवड, प्रशस्त सभामंडप किंवा हॉल आणि शेवटी भव्यदिव्य मंदिर बांधणे अशी येथील भक्तांची मनोमन इच्छा आहे.

Exit mobile version