आईचा आशीर्वाद हरपला

लतादीदींच्या जाण्यानं एका स्वरयुगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले, आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या, हे अत्यंत दुःखद आहेत. पण, त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. विश्‍व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादी आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबीयांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असताना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील. लतादीदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर, त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

…अन् ‘ऐ मेरे वतने के लोगों’ ‘सिग्नेचर ट्यून’ बनलं!
कवी प्रदीप यांनी लिहिलेलं हे अलौकिक गाणं त्यांनी आपली बहीण आशा भोसलेंसह ‘ड्यूएट’ रेकॉर्ड करावं, अशी लतादीदींची इच्छा होती. परंतु, कवी प्रदीपजींनुसार लतादीदींच्या आवाजात जी भावना आहे, ती इतर कोणालाही जमणार नाही, म्हणून ते गाणं फक्त लतादीदींनीच रेकॉर्ड करावं, असं प्रदीपजींचं ठाम मत होतं. त्यामुळे आशा भोसलेंनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली. अहोरात्र काम करत असताना एका गाण्याकडे विशेष लक्ष देणं अशक्य वाटतं, असं सांगत लतादीदींनीही गाण्यास नकार दिला. संगीतकार-गायक हेमंत कुमार यांनी खरं तर संपूर्ण ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हा प्रोजेक्ट तयार केला होता. त्यांनीच लतादीदींना हे गाणं गाण्यासाठी तयार केले. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर काही काळातच लिहिलेल्या या ऐतिहासिक गीताने जनतेला एकत्र आणण्याची विलक्षण कामगिरी केली. दीदींनी हे गाणं गातेवेळची त्यांची मनःस्थिती व्यक्त करताना काही गोष्टींचा खुलासा केला होता.
दीदी म्हणाल्या की, हे गाणं कोणत्याही चित्रपटाचा भाग नसल्यामुळे त्याचा परिणाम मर्यादितच होईल असं मला वाटलं होतं; परंतु ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गीत माझं ‘सिग्नेचर ट्यून’च बनलं. जोपर्यंत मी ते गात नाही, तोपर्यंत माझा कोणताही कार्यक्रम, मैफिल पूर्ण होत नाही.

आता विसाव्याचे क्षण…!
‘आता विसाव्याचे क्षण’ ही कविता बा. भ. बोरकरांनी लिहिली आहे. त्याला सलील कुलकर्णी यांनी संगीताचा साज चढवला आहे. हे गाणं जवळपास पाच वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलं होतं. पण, अचानक या गाण्यासोबत लतादीदींच्या निवृत्तीच्या बातम्या येऊ लागल्याने आश्‍चर्य व्यक्त केलं जात होतं. पण, लतादीदींनीच ही अफवा खोटी असल्याचं स्पष्ट केलं होतं. अखेरच्या श्‍वासापर्यंत गाण्यावर प्रेम करणार्‍या लतादीदींना आज मात्र विसावा घेतला आहे. 2018 साली सोशल मीडियावर लतादीदींचं एक गाणं वेगाने व्हायरल झालं. ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणं लतादीदी यांचं निवृत्तीचं गाणं असल्याचा मेसेजही या गाण्यासोबत व्हायरल होत होता. त्यामुळे त्यांच्या फॅन्सनीही नाराजीचा सूर आळवला होता. ही बाब लतादीदींच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी या निवृत्तीच्या बाबींचा साफ इन्कार केला. याबद्दल बोलताना एका मुलाखतीत लता दीदी म्हणल्या की, ‘माझ्या निवृत्तीच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. हे एखाद्या रिकामटेडया व्यक्तीचं काम असावं. मी शेवटच्या श्‍वासापर्यंत गातच राहणार आहे.’ लतादीदींच्या या विधानामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला होता.

Exit mobile version