नेरळमध्ये स्वाक्षरी अभियान
| नेरळ। प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतीचे रुपांतर नेरळ नगरपरिषदेमध्ये व्हावे यासाठी ‘होय.. नेरळ नगरपरिषद व्हावी.. ’, ‘एक सही.. नेरळ नगरपरिषदेसाठी’ अशी चळवळ नेरळमध्ये हुतात्मा स्मारक समितीने संयोजन करून सुरू केली आहे. त्यासाठी 15 ऑगस्ट रोजी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील रहिवासी, नागरिक यांच्या सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे. दरम्यान, या सह्यांच्या मोहिमेनंतर ते निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार यांना देण्यात येणार आहे.
नागरीकरण होत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सध्या एकमेव सदस्य आहेत. अन्य सदस्यांनी राजीनामे दिल्याने नेरळ ग्रामपंचायत लवकरच बरखास्त होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासकाची नियुक्ती कधी करणार याकडे नेरळकरांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे शहरीकरणाकडे वळलेल्या नेरळ ग्रामपंचायतीचे नेरळ नगरपरिषदेमध्ये रुपांतर व्हावे यासाठी नेरळ ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी हुतात्मा स्मारक समितीने पुढाकार घेतला असून, ‘ होय.. नेरळ नगरपरिषद झालीच पाहिजे’ अशी चळवळ उभी राहिली आहे. या माध्यमातून 15 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर तसेच नेरळ चावडी नाका आणि नेरळ गावातील प्रत्येक विभागात ही सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे.
नेरळ गावातील जयदीप क्रीडा मंडळ, मातोश्री नगर, पाडा, बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज चौक, टेप आळी माऊली मेडिकल, हेटकर आळी गणेश मंदिर, गणेश नगर पायर माळ, चिंचआळी श्री दत्त मंदिर, मोहाची वाडी, श्री साई चौक, पोलीस ठाणे, वाल्मिक नगर, खांडा हनुमान मंदिर, नेरळ स्टेशन, गोरा कुंभार चौक, महावीर चौक आदी ठिकाणी हे स्टॉल्स लावले जाणार आहेत. त्याचवेळी सह्यांची मोहीम यशस्वी करण्यासाठी शेकडो तरुण या मोहिमेत सह्या घेण्याचे प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी सही घेण्याचे पत्रक आणि बॅनर प्रत्येक विभागात त्या त्या भागातील तरुणांनी घेतले आहेत. प्रत्येक भागातील तरुण घरोघरी जाऊन सह्या संकलित करण्याचे काम करीत आहेत. या सर्व सह्यांचे निवेदन रविवारी (दि.18) कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अलिबाग येथे जाऊन रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोकण आयुक्त तसेच मुंबई येथे जाऊन राज्य निवडणूक आयोग यांना दिले जाणार आहे. तर, आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले जाणार आहे.