सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत कोंडीवडे या राज्यमार्गावरील शिरसे गावाजवळ निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी या रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्यावर खड्डे भरण्यासाठी दबाव आला होता.
कर्जत तालुक्यातील कोंडीवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिरसे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. त्या ठिकाणी निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून वाहतूक कोंडीची समस्या अद्भवत आहेत. तसेच, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींचे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावेत, यासाठी पोलीस मित्र संघटना रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करणार होती. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याबाबत बांधकाम विभाग अद्यापही सुस्तच आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या इशाऱ्यानुसार पोलीस मित्र संघटनेने शिरसे येथे रस्त्यावर निर्माण झालेल्या डबक्यात बसून अनोखे आंदोलन केले आहे.
यावेळी पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी पांढऱ्या शुभ्र कपड्यात रस्त्यावरील चिखलाने भरलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केले.त्या आंदोलनाबाबत जोरदार चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दशरथ मुने यांच्यासह स्थानिक वाहनचालक यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यानंतर दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले असून सायंकाळी प्रत्यक्ष खड्डे भरण्यास सुरुवात झाली.
