हजारो अनुयायी सामील होणार जनआक्रोश आंदोलनात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बुध्दगयातील महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी आणि दिक्षाभूमी मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईमधील आझाद मैदानात बुधवारी (दि.17) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीम सैनिक धडक देणार आहेत. रायगड जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने बुध्द अनुयायी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा रायगड उत्तरचे अध्यक्ष सुशील वाघमारे यांनी दिली.
भगवान बुध्द यांना बुध्दत्व प्राप्त झाले. त्या बुध्दगयातील महाबोधी महाविहार जागतिक बौध्दांचे श्रध्दास्थान आहे. या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात भारतीय बौध्द महासभेने एल्गार पुकारला आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा भारतीय बौध्द महासभा उत्तर शाखा रायगडच्या वतीने बैठकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जिल्हा, तालुका स्तरावर बैठका घेत या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष सुशील वाघमारे यांनी केले.
मुंबईत होणाऱ्या जनआक्रोश आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील भीम व बौध्द अनुयायींनी तयारी केली आहे. काहीजण मंगळवारी तर काही जण बुधवारी सकाळी मुंबईला रवाना होणार आहेत. भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा, तालुका, शहर, वार्ड, ग्रामशाखेचे पदाधिकारी, सभासद, केंद्रीय शिक्षक, श्रामणेर, बौध्दाचार्य, समता सैनिक दलाचे अधिकारी, जवान असे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने अनुयायी आंदोलनात सहभागी होतील, असे सुशील वाघमारे यांनी
सांगितले आहे.
