निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशपातळीवर आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभा उत्तर शाखा रायगड आणि वंचित बहूजन आघाडीच्यावतीने बुधवारी (दि.12) दुपारी अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत असंख्य बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय बौध्द महासभा रायगड (उत्तर) जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, कोषाध्यक्ष राजेंद्र पावसकर, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा उषा कांबळे, सरचिटणीस छाया गवई, कोषाध्यक्षा त्रिशला सावळे, वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, आदी पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. मात्र, शासनाकडून अद्यापर्यंत त्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे देशभरातील बौद्ध अनुयायींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून महाविहाराच्या मुक्तीसाठी बौद्ध समाज एकत्र आला आहे. वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बुद्धगया येथील आंदोलनाला पाठींबा दर्शविला जात आहे. दरम्यान, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा (उत्तर) आणि वंचित बहूजन आघाडी रायगड जिल्हा (उत्तर) यांच्यावतीने या आंदोलनाला पाठींबा देण्यात आला आहे.
यावेळी अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली महावीर चौक, बालाजी नाका मारुती नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली होती. या रॅलीला बौद्ध अनुयायींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठमंडळींसह तरुण मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. अलिबाग शहरातील हिराकोट तलाव या ठिकाणी रॅलीचे रुपांतर सभेमध्ये झाले. त्यानंतर ज्ञानेश्वर गायकवाड, उषा कांबळे, दिपक गायकवाड आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
बुद्धगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा, महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशा अनेक मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. तसेच, या मागण्यांची दखल घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली. भारतीय बौद्धसभा व वंचित बहूजन आघाडीचे पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. संबंधित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनासह शासनाने या मागण्यांची दखल घ्यावी.
ज्ञानेश्वर गायकवाड,
अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा (उत्तर) रायगड