। चणेरा । प्रतिनिधी ।
राज्य शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना सुरू आहेत. या सर्व योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शासनाबरोबरच दीपक फाउंडेशनचा खारीचा वाटा असतो, असे प्रतिपादन रोहा पंचायत समितीचे अधिकारी रणजीत लवटे यांनी केले आहे.
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील दीपक फाऊंडेशन व दीपक नायट्राईट मार्फत राबवण्यात येणार्या संगाथ प्रकल्प प्रसार कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी (दि.11) रोह्यातील अक्षय लॉन्स येथे करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, बांबू ही शेती अतिशय महत्त्वाची आहे. कारण भौगोलिक दृष्टिकोनातून तापमानाचा विचार केला तर थोडेफार प्रमाणात उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी बांबूची लागवड करणे गरजेचे आहे. त्यामुळे बांबूची शेती जास्तीत जास्त लोकांनी करावी. त्यासाठी दीपक फाऊंडेशनने लाभार्थी शोधून पुढाकार घ्यावा, असे आवाहन लवटे यांनी दीपक फाउंडेशनला केले आहे.
या कार्यशाळेदरम्यान संस्थेचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख स्मिता मणियार यांनी दीपक फाऊंडेशन व त्या मार्फत चालवल्या जाणार्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. तसेच, दीपक फाऊंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक कामिल यांनी रोहा तालुक्यात संगाथ प्रकल्प अंतर्गत मागील 3 वर्षात विविध शासकीय योजनांमार्फत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर महादेव करे यांनी दीपक फाऊंडेशन मार्फत चालू असलेल्या कार्याबद्दल कौतुकास्पद मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महादेव करे उपस्थित होते. त्याचबरोबर रोहा तालुक्यातील सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, रोजगार सेवक व दीपक फाऊंडेशन रोहा येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.