। अलिबाग । प्रतिनिधी ।
बोधगया महाविहारावर पूर्णपणे बौद्ध धर्मियांचा ताबा देण्यात यावा या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड जिल्हा शाखेतर्फे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राज्य सचिव सूर्यकांत कासे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शिंदे , भारत मुक्ती मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष विजय आवासकर जिल्हाध्यक्ष, बामसेफ, रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर म्हात्रे , बौद्धजन पंचायत समिती अलिबागचे परशुराम ओव्हाळ, विकास जाधव, प्रकाश जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
बोधगया हे जगातील सर्व बौध्दांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुध्दांना संबोधी प्राप्त झाली होती. या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती. हे पवित्र स्थळ बोधगया महाविहारावर काही मंडळींनी कब्जा केला आहे. त्यामुळे या महाविहाराचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी देशभर आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी अलिबागमध्येदेखील आंदोलन करण्यात आले. महाबोधी महाविहार ही बौध्दांची जागतिक विरासत आहे. महाबोधी महाविहाराच्या जागेवर कब्जा केलेल्या महंताच्या खोलीत अद्यापही बुध्दप्रतिमा, शीलालेख, अभिलेखे आहेत. या ऐतिहासिक वास्तु पुरातत्व विभाग, बोद्धगया संग्रहालयात जमा करण्यात याव्या. महाबोधी महाविहाराजवळ सम्राट अशोकाचा राजवाडा होता. तो शोधण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.