। रायगड । प्रतिनिधी ।
जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती तसेच, इतरही अनेक प्रसंगात अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अखंडित सेवा देतात. किंबहुना त्यांच्या हाती राज्याच्या प्रगतीची धुरा असल्याचे गौरवोद्गार महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी व्यक्त केले.
वीज वितरण व्यवस्थेचा कणा असलेल्या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कल्याण परिमंडलात सलग तिसर्या वर्षी मंगळवारी (दि. 04) आयोजित लाईनमन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, मोहन काळोगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जगदाळे म्हणाले, जनमित्रांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजात सुरक्षा, स्वाभिमान आणि सेवा हे तीन ब्रीद पाळण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या कामातून गणवेशाचा सन्मान वाढवावा. प्रशिक्षण हे भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यात मोठी मदत करत असल्याने वेळोवेळी आयोजित प्रशिक्षणात त्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा. आपली पुढची पिढी डोळ्यासमोर ठेवून कामाच्या वेळी सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी जनमित्रांना केले.
कल्याण व भांडुप परिमंडलांतर्गत विविध विभाग, उपविभाग स्तरावर बाईक व सायकल रॅली, रक्तदान शिबीर आदीच्या आयोजनातून लाईनमन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या उपस्थितीत कोलशेत उपविभागात आयोजित कार्यक्रमात जनमित्रांचा सन्मान करण्यात आला. तणावमुक्त जीवन तसेच आहार आणि आरोग्य या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. तर ठाणे मंडलांतर्गत इटर्निटी उपकेंद्रात मुख्य कार्यालयातील अधीक्षक अभियंता जितेंद्र फुले यांचे आर्थिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.