। अलिबाग । प्रतिनिधी ।
देशासह राज्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. महिला व मुलींची परिस्थिती भयावह आहे. मुलींच्या शिक्षणाला थांबविण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. मात्र, वृत्तीला रोखण्यासाठी, तसेच मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी सायकल वाटपाचे कार्य हाती घेतले आहे. चाक हे गतीचे प्रतिक आहे. सायकली घेऊन अशा पुढे जा, असे आवाहन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थिनींना केले. सायकल वाटपातून मुलींच्या शिक्षणाला उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
अलिबागमधील कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये अलिबाग व मुरूड तालुक्यातील दोनशेहून अधिक मुलींना सायकल देण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शनिवारी (दि. 8) हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजिस प्रा.लि. या कंपनीच्या सीएसआर प्रमुख राधा आगरवाल, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, अॅड. त्रिशा, सीएफटीआयच्या रेश्मा शेजपाल, शरयू अधिकारी, रश्मी वाळंज, नागेश्वरी हेमाडे, अनिता पवार तसेच अॅड. परेश देशमुख, अमित देशपांडे आदी मान्यवरांसह महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या, अलिबाग व मुरूडमधील विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, संस्था उभारणे, त्या वाढविणे, रुजविणे आणि मोठे करणे हे शेतकरी कामगार पक्षाचे ध्येय धोरण राहिले आहे. आज वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनेकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. सीएफटीआय ही संस्था मिझोरामसह अन्य राज्यात कार्यरत असली तरीदेखील या संस्थेचा जन्म अलिबागमध्ये झाल्याचा आनंद आहे. पाणी, शिक्षण, आरोग्याबरोबरच ग्रामीण विकास आणि महिलांच्या प्रश्नांबाबत ही संस्था काम करीत आहे. 80 हजारांहून अधिक लाभार्थी असून, अनेकांना रोजगाराचे दालन खुले आहे. दिल्लीपासून अलिबागपर्यंत या संस्थेतील कर्मचारी तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून काम करीत आहेत. संस्थेचा जनतेला फायदा झाला पाहिजे, या भूमिकेतून काम केले जात आहे. देशातील 50 नामवंत कंपन्यांपर्यंत ही संस्था काम करीत आहे. या संस्थेचे समाजकार्य खूप चांगले राहिले आहे. ही संस्था सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत असल्याचा आनंद आहे.
शाळकरी मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा, त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी, यासाठी सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजिस प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून शाळकरी मुलींना सायकल देण्याचा प्रयत्न केला आहे.
देशात वेगवेगळ्या संस्था आहेत. सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजिस प्रा.लि. ही एक त्यामध्ये संस्था आहे. त्यांच्या मदतीने गरीब गरजूंना आधार देण्याबरोबरच भूमीपुत्रांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाटील कुटुंबियांसह शेतकरी कामगार पक्ष कायमच भूमीपुत्राच्या पाठीशी राहिला आहे. कोणतेही प्रश्न असू दे, ते सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगे यांनी केले.
शाळकरी मुलींना सायकलचा आधार
ग्रामीण भागातील गावे, वाड्यांमध्ये राहणार्या मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून शाळकरी मुलींना सायकली देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 25 हजारांहून अधिक मुलींना सायकली देऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि.8) अलिबाग व मुरूड तालुक्यातील दोनशेहून अधिक मुलींना चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने सायकली वाटप करण्यात आल्या. शाळकरी मुलींना शिक्षणासाठी सायकलचा आधार मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर एक वेगळा आनंद दिसून आला.
महिलांची भक्कम फळी निर्माण करण्याची गरज: अॅड. मानसी म्हात्रे
शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने एक चांगला व उपयुक्त असा उपक्रम हाती घेतला आहे. सीएफटीआयच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शाळकरी मुलींना सायकल देऊन त्यांच्या शिक्षणाला गती देण्याचे काम केले जात आहे. भविष्यातील या ज्ञानाच्या ठेवी समाज घडविणार्या आहेत. विकासाला धक्का देत आकाश कवेत घेण्याचे काम सर्वांना करायचे आहे. मुलींच्या संरक्षणासाठी सक्षमपणे उभे राहण्याची गरज आहे. सामाजिक स्तरावर महिला सुरक्षित ठेवण्याचे काम करणे आवश्यक आहे. महिला सुरक्षेसाठी शासन, पोलीस प्रशासन कमी पडत आहे. महिला सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. महिलांची भक्कम फळी निर्माण करण्याचे काम करू या. शेकापकडून 2025 हे वर्ष महिला सुरक्षितता वर्ष म्हणून जाहीर करू, असे आवाहन अॅड. मानसी म्हात्रे यांनी केले.