बोर्लीपंचतन बसस्थानकाच्या दारात चिखल

नूतन बसस्थानकावर असुविधांची गर्दी

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बसस्थानकाच्या दारातच चिखल झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. वाढत्या प्रवाशांच्या गर्दीपुढे हे बसस्थानक समस्यांच्या गर्तेत आहे.

बोर्लीपंचतन शहरातील नागरिकांना अनेक संघर्षानंतर तब्बल चार वर्षांनी बसस्थानकाचा प्रश्‍न सोडवण्यात यश मिळाले. त्यानंतर येथे निवारा शेड उभारण्यात आली. मात्र, कमी क्षेत्रात बांधण्यात आलेल्या बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी असणारी आसन क्षमता ही पुरेशी नसल्याने बहुतेकदा प्रवासी आवारात उभे राहून एसटी बसची वाट पाहत असतात. परंतु, त्याच जागेत मोठ्या प्रमाणावर असलेल्या चिखलामुळे प्रवासी आणखी त्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील बोर्लीपंचतन हे मध्यवर्ती ठिकाण असून, अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे येथील बसस्थानक आहे. मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी धावणार्‍या एसटी बसेसमुळे व पर्यटकांसाठी सोईस्कर असणारे बसस्थानक हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे मानले जाते. येथे दिवसातून येणार्‍या – जाणार्‍या 78 गाड्यांची नोंद होत असून, शहारांकडे नेहमीच नागरिक प्रवास करत आहेत. असे असतानाही येथे सुविधांचा अभाव नेहमीच ऐकायला मिळत आहे. एसटी महामंडळाचे प्रशासन मात्र, या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की काय अशी खंत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

चिखलामुळे गाड्या बसस्थानकाच्या बाहेर
बसस्थानकाच्या दारातच चिखल झाल्याने येणार्‍या-जाणार्‍या बस दूरवर थांबा घेत आहेत. त्यामुळे शंभर मीटरवर प्रवाशांची गाड्या पकडण्यासाठी चिखल तुडवत धावपळ उडत आहे.

बसस्थानक समोरील नूतन रस्ता संबंधित विभागाकडून बांधण्यात आला आहे. त्यांच्याकडे दुरूस्तीची मागणी करणार आहोत.

महेबुब मनेर,
आगार प्रमुख, श्रीवर्धन

Exit mobile version