| चिरनेर | प्रतिनिधी |
25 सप्टेंबर 1930 रोजी ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन चिरनेर आक्कादेवीच्या जंगलात इतिहास घडवला. अर्थात, 25 सप्टेंबर 1930 रोजी चिरनेर गावाजवळील अक्कादेवीच्या जंगलात आक्रमक स्वरूपाचा जंगल सत्याग्रह झाला. सविनय कायदेभंगाच्या या चळवळीत अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्म्यांची स्मृती जागविण्यासाठी पूर्वीच्या कुलाबा व आजच्या रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावी 25 सप्टेंबर रोजी, हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या 94 व्या. हुतात्मा स्मृतीदिन कार्यक्रमाची ऐतिहासिक चिरनेर गावात जोरदार तयारी सुरू असून, चिरनेर ग्रामपंचायत, रायगड जिल्हा परिषद व उरण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी 25 सप्टेंबर रोजी हा चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे.
मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत, हा चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 94 वा. हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार महेश बालदी, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योगपती पी.पी. खारपाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, जेएनपीटीचे चेअरमन उन्मेश वाघ, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, बबन पाटील, आर.सी. घरत, विशाल नेहुल, संतोष ठाकूर, राजेंद्र खारपाटील, विनोद म्हात्रे, रवी भोईर, विकास नाईक, शुभांगी पाटील, यशोदा परदेशी, उद्धव कदम, समीर वाठारकर, राजेंद्र मिसाळ, दिनेश पाटील, रवींद्र पाटील, भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे माहिती सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी यांनी दिली.
सकाळी ठीक 11.30 वाजता चिरनेर येथील हुतात्मा स्मृतीस्तंभाजवळ चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्यवीरांना पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून व मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून, सलामी देत, शासकीय इतमात मानवंदना देण्यात येणार आहे. यावेळी हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.