तरीही खारपाडा टोलवसुलीवर संताप
| चिरनेर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल 18 वर्षांपासून रखडलेले असताना आणि अनेक ठिकाणी महामार्ग अद्याप अपूर्ण अवस्थेत असतानाच पेण तालुक्यातील खारपाडा येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोलवसुली सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेने आक्रमक भूमिका घेत कडाडून विरोध दर्शविला आहे.
पनवेल तालुका अध्यक्ष शैलेश घरत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलवसुली तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले. महामार्गाचे काम पूर्ण न होता टोल आकारणे अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
गेल्या 18 वर्षांत महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. आजही अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी एनएचआयने अचानक टोल सुरू केला आहे, असा आरोप शैलेश घरत यांनी केला. यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष भानुदास जांभळे, पनवेल तालुका संघटक अनंत कोंडिलकर तसेच पनवेल आणि खालापूर तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. छावा क्रांतिवीरचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या पत्रकाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते कासू या 42 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी खारपाडा येथे 15 मे 2026 पासून टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. मात्र, महामार्गावरील अनेक सेवा रस्ते, उड्डाणपूल, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. कोलाड, नागोठणे आणि कोलेटी येथील पुलांची कामे अर्धवट असून, माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे कामही प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.
टोलवसुली सुरू झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट, मनसे, शेतकरी कामगार पक्षासह विविध संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर रायगड जिल्ह्यातील -06 नोंदणीकृत वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली. मात्र, ही सवलत केवळ पेण आणि पनवेल परिसरापुरती मर्यादित असल्याने ‘रायगडकरांना टोलमाफी’ ही घोषणा दिशाभूल करणारी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, वाहनचालक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता टोलनाका सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. “महामार्गावर अजूनही खड्डे आहेत, सेवा रस्ते पूर्ण झालेले नाहीत, वाहतूक कोंडी कायम आहे. मग नागरिकांनी टोल कोणत्या सुविधेसाठी भरायचा?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 31 मेपर्यंत महामार्गाचे काम शंभर टक्के पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हे काम वेळेत पूर्ण होण्याबाबत नागरिकांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. मंत्री अदिती तटकरे यांनीही टोलवसुलीला विरोध दर्शवत केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेने स्थानिक वाहनांना तातडीने टोलमुक्ती द्यावी तसेच महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण केल्यानंतरच टोलवसुली करावी, अशी ठाम मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
