प्लेऑफचा मार्ग पूर्णपणे बंद?; क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय
| चेन्नई | वृत्तसंस्था |
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची आयपीएल 2026 मधील कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरत आहे. शनिवारी (दि.2) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या मोठ्या सामन्यात त्यांना आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे हा मुंबईचा 9 सामन्यांमधला 7वा पराभव ठरला आहे. त्यामुळे मुंबईचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग पुर्णपणे बंद झाला का? हा क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, मुंबईने आपल्या 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावांची एकूण धावसंख्या उभारली. मुंबईकडून नमन धीरने शानदार अर्धशतक झळकावले आणि 57 धावांची खेळी करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. 37 चेंडूंचा सामना करताना त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. दरम्यान, रायन रिकलटनने 37 धावांचे योगदान दिले. तर वील जॅक्स (1), सुर्यकुमार यादव (21), तिलक वर्मा (3), हार्दिक पांड्या (18), रॉबिन मीन्झ् (5), क्रिश भगत (3) आणि ट्रेंट बोल्ट (7) यांनी मुंबईच्या चाहत्यांना निराश केले. यावेळी चेन्नई सुपर किंग्सकडून अंशुल कंबोजने 3 गडी बाद केले. तर, नूर अहमदने 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
मुंबईच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, चेन्नई सुपर किंग्सने 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 160 धावांचे लक्ष्य गाठले. त्यामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या आक्रमक अर्धशतकाचा सिंहाचा वाटा होता. ऋतुराजने 48 चेंडूंत 67 धावांची खेळी केली आणि तो नाबाद राहिला. त्याच वेळी, कार्तिक शर्मानेही 39 चेंडूंत एक शानदार अर्धशतक झळकावले. कार्तिक आणि गायकवाड यांनी तिसऱ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी रचली. कार्तिकने चौकार मारून चेन्नईचा विजय निश्चित केला. त्याने 40 चेंडूंत 54 धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
या पराभवानंतर मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे का? त्यांचा प्लेऑफचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे का? अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, अधिकृतरीत्या तसे झालेले नाही. मुंबईने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यात फक्त 2 विजय मिळवले आहेत, तर 7 पराभव झाले आहेत. सध्या मुंबईकडे 4 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहेत. मुंबईचे अजून 5 सामने बाकी आहेत. हे सर्व सामने त्यांनी जिंकले तरीही ते जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंतच पोहोचू शकतात. आयपीएल इतिहासात 14 गुणांसह प्लेऑफमध्ये जाणे अत्यंत कठीण राहिले आहे. त्यामुळे आता मुंबईचे भवितव्य पूर्णपणे त्यांच्या हातात राहिलेले नाही. प्लेऑफसाठी त्यांना उरलेले सर्व सामने जिंकावे लागतील. एकही चूक झाली तर ते स्पर्धेतून बाहेर पडू शकतात. तसेच, त्यांना इतर निकाल आणि पावसाचा अडथळा यावरही अवलंबून राहावे लागेल.
प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण
मुंबई इंडियन्सचे पुढील सामने लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यासोबत होणार आहेत. या पाचपैकी तीन संघ सध्या अंतिम चारमध्ये आहेत. त्यामुळे मुंबईसाठी आव्हान अधिक कठीण झाले आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना या तिन्ही मजबूत संघांना हरवणे अत्यावश्यक आहे. शेवटी, जर गुण बरोबरीत आले तर नेट रन रेट निर्णायक ठरेल. मुंबईचा नेट रन रेट अंतिम चारमधील 14 गुणांवर अडकलेल्या संघापेक्षा चांगला असेल तरच त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळू शकते.
