मंत्री उदय सामंत यांची माहिती
| नागपूर | वृत्तसंस्था |
मुंबई महानगरपालिकेच्या मागील 25 वर्षातील अर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण होणार आहे. तीन सदस्यांची समिती गठीत करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेनेची 25 वर्षे सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे लेखापरीक्षण करण्याची मागणी होत आहे. या कालावधीत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून कायम करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेत 8 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली होती. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात ओढले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा फक्त ट्रेलर असल्याचे सांगून खरा पिक्चर बाकी असल्याचे म्हटले होते. मुंबईत शिवसेना आणि ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून, त्या पार्श्वभूमीवर हे लेखापरीक्षण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.





