| रायगड | प्रतिनिधी |
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होईल. आता सहा पदरी असलेला हा महामार्ग दहा पदरी करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याआधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आठ पदरीकरण करण्याचा निर्णय घेत त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. आता आठऐवजी थेट दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या दहा दिवसांत यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने मुंबई- पुणे प्रवास अतिजलद करण्यासाठी 94.5 किमी लांबीचा मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग बांधला. हा महामार्ग 2002 मध्ये पूर्णत: वाहतुकीसाठी खुला झाला आणि मुंबई ते पुणे अंतर केवळ अडीच तासात पार करणे शक्य होऊ लागले. सध्या या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सहा पदरी महामार्ग अपुरा पडू लागला आहे.
एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार द्रुतगती महामार्गावरून दररोज 65 हजार वाहने धावतात. गर्दीच्या वेळी ही संख्या एक लाखांवर जाते. भविष्यात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता एमएसआरडीसीने सहा पदरी महामार्गाचे आठ पदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. महामार्गाच्या दोन्ही बाजूने एक एक मार्गिका वाढविण्याचा निर्णय घेत यासंबंधीचा अंदाजे 6080 कोटी रुपयांचा प्रस्ताव फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. मात्र, आता नव्याने प्रस्ताव तयार करून महामार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली.