| अहमदनगर | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनच्या वतीने पारनेर क्रीडा संकुलावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पुरुष गटात मुंबई तर महिला गटात सोलापूरने बाजी मारली आहे.
आ.निलेश लंके यांच्या मार्गदर्शनात पारनेर येथे आयोजित डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशन महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा व निवड चाचणीत महिला गटात सोलापूर तर पुरुष गटात मुंबई संघ विजयी ठरले.पुणे जिल्ह्याला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले तर, जळगाव तृतीय तर अहमदनगर जिल्हा चौथ्या स्थानावर राहिला.
पारनेर शहरातील क्रीडा संकुलावर अत्याधुनिक मैदानाची निर्मिती करत आमदार निलेश लंके यांच्या सहकारांनी या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आयोजन करुन नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. या स्पर्धे दरम्यान उपांत्य व अंतिम फेरीचे सामने अतिशय रोमहर्षक व अटीतटीचे झाल्याने पारनेरकरांनी त्याचा थरार अनुभवला. यावेळी , व्हॉलीबॉल संघटनेचे शरद कदम, प्रा. बबनराव झावरे, प्रा. संजय लाकुडझोडे, अशोकशेठ कटारिया, नगराध्यक्ष विजय सदाशिव औटींसह, अर्जुन भालेकर, जयवंत साळुंखे हजर होते.
राज्यस्तरीय स्पर्धेच्या दुसर्या दिवशी दुपारच्या सत्रानंतर झालेल्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या जिल्हा प्रथम क्रमांक तर अहमदनगर जिल्हा दुसरा क्रमांकावर आला. यात सोलापूरच्या अर्शिया इनामदार, अल्फिया शेख, अनम रंगरेज, मुन्नजा रंगरेज साजिया इनामदार, सिमरन शेख यांनी अतिशय उत्कृष्ट खेळ करून विजय मिळविला. तर पुरुष गटात मुंबई संघाने पुण्याच्या संघाला धुळ चारीत प्रथम क्रमांक मिळविला. यात मुंबईच्या हर्षलचा खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. त्याने मारलेल्या स्मॅशला परतविणे विरोधी संघाला शक्य होत नव्हते.दोन दिवशीय या स्पर्धे दरम्यान अनेक नामांकित व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी क्रिडा शौंकीनांचे दाखवून डोळ्याचे पारणे फेडले आहे.