नगरपरिषदेचा टेंडर घोटाळा उघड

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार
नगराध्यक्ष घाणेकरांकडून आरोप

| उरण | प्रतिनिधी |

उरण नगर परिषदेत ‌‘भाडे आणि टेंडर‌’ प्रक्रियेच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून एका कंत्राटदाराच्या नावाने तब्बल दहा वर्षे व्यवहार चालवण्यात आल्याचे समोर आले असून, या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत हा प्रकार उजेडात आणला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल” येथील ठेक्यांमध्ये गंभीर अनियमितता झाली असून, 2013 पासून एका व्यक्तीच्या नावाचा व कागदपत्रांचा गैरवापर करून कामे देण्यात आली. या प्रकरणात नवी मुंबईतील कंत्राटदार वासुदेव छगन पाटील यांच्या ‌‘मे. वी.सी. पाटील इंटरप्रायजेस‌’ या फर्मच्या नावाने बनावट पॅनकार्ड, रेशनकार्ड, आयकर विवरणपत्र तसेच खोट्या सह्यांच्या आधारे टेंडर मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, संबंधित कंत्राटदाराने “मी असे कोणतेही काम घेतलेले नाही,” असे स्पष्ट करत आपल्या नावाचा गैरवापर झाल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, मुख्याधिकारी समीर जाधव रजेवर असल्याने अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. उरण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या घोटाळ्यामागील सूत्रधार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उरण नगर परिषदेत यापूर्वीही विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी होत आल्या आहेत. त्यामुळे या नव्या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये संताप वाढला असून, सर्व घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

एक कोटींहून अधिक थकबाकी
2015 ते 2026 या कालावधीत क्रीडा संकुलातील विविध सुविधा चालवून नगरपरिषदेची तब्बल 1 कोटी 1 लाख 63 हजार 498 रुपयांची थकबाकी राहिल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात वासुदेव पाटील यांनी 24 मार्च 2026 रोजी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
माहिती अधिकारातही दिशाभूल?
माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतही विसंगती आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पत्रकारांना नगरपरिषदेकडून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हा घोटाळा जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Exit mobile version