| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. प्रभाग क्रमांक 19 मधील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, रामशेठ सामाजिक विकास मंडळ रोड तसेच ऑफिस रोड परिसर जलमय झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. या परिस्थितीची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे आणि स्वच्छता निरीक्षक महेंद्र भोईर यांनी कर्मचारी व यंत्रणेसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गटारे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या मार्गातील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. पालिकेच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे काही वेळातच साचलेले पाणी कमी झाले आणि वाहतुकीला पुन्हा गती मिळाली. सतत सुरू असलेल्या पावसातही अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते.







