ड्रग्स माफियाच्या कथित साम्राज्यावर पालिकेचा बुलडोझर

कळंबोलीतील अनधिकृत शेड जमीनदोस्त

| पनवेल | प्रतिनिधी |

कळंबोली वसाहतीमधील ड्रग्स माफिया वसीम लुंगीच्या कथित साम्राज्यावर अखेर प्रशासनाने धडक कारवाई करत कळंबोली वसाहतीतील झोपडपट्टी परिसरात शेळीपालनाच्या नावाखाली उभारण्यात आलेले अनधिकृत शेड जमीनदोस्त केले. पनवेल महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार प्रभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभाग अधीक्षक अरविंद पाटील यांच्यासह पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. या अनधिकृत बांधकामाविरोधात समाजसेविका प्रियंका गाडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या तक्रारींची दखल घेत पालिकेने अखेर कठोर कारवाई केली. यापूर्वी नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी संदीप निगडे यांच्या पथकाने वसीम लुंगीविरोधात अमली पदार्थ प्रकरणी कारवाई केली होती. झालेल्या अतिक्रमण हटाव कारवाईवेळी निगडे यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आश्रय देणाऱ्या सर्व अनधिकृत बांधकामांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Exit mobile version