| मुंबई | वृत्तसंस्था |
पूर्ववैमनस्यातून अक्कलकोट येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. शनिवारी सकाळी अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला. तर, पोलिसांनी या प्रकरणात दोघा संशयितांना अटक केली आहे. अक्कलकोट येथील भीमनगर परिसरात राहणार्या महेश सुरेश मडीखांबे या 35 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणात संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दिलीप मडिखांबे, यल्लपा मडीखांबे असे अटक झालेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.