। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दक्षिण-पूर्व दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात एका तरूणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. 22 वर्षीय तरूणीच्या या हत्येने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज म्हणजेच बुधवारी सकाळी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी तरूणीचा मृतदेह तिच्या घरी सापडला आहे. ही तरूणी IRS ऑफिसरची मुलगी असल्याचंही समोर आले आहे. पोलिसांनी सांगितलं की, या तरूणीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. पहिल्यांदा या तरूणीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर मोबाईल चार्जरच्या केबलने तिचा गळा आवळण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात संशयाची सुई ही घरात काम केलेल्या नोकरावर आहे. या नोकराला दीड महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे बदला घेण्याच्या हेतूने त्याने हे चुकीचं कृत्य केलं असल्याची शंका आहे.
बुधवारी सकाळी तरूणीचे आई-वडील जीमसाठी म्हणून घराबाहेर गेले होते. त्याचवेळी आरोपीने हा डाव साधल्याची शक्यता आहे. पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला घरी पाठवून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. हत्या झालेल्या तरूणीने इंजिनियरींगचा शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर आता ती युपीएससीची तयारी करत होती. ज्या नोकरार संशय व्यक्त केला जातोय तो मुळचा राजस्थानचा रहिवासी असल्याची माहिती आहे. आणि या नोकराला काही दिवसांपूर्वीच कामावरून काढून टाकल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच संशयित आरोपीच्या शोधासाठी खास पथकं तयार करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, आमचे प्रयत्न सुरु असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.





