लोकसभेत घमासाम चर्चा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतमाता ही माझी आई आहे. मणिपूर हे भारताचं अविभाज्य अंग आहे. या सरकारने मणिपूरचे दोन तुकडे केलेत. म्हणजे या सरकारने माझ्या आईचेच तुकडे केले आहेत, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. लोकसभेत सरकारवरील अविश्वास ठरावावरील सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी भारत जोडो यात्रा, अदानी प्रकरण आणि धगधगत्या मणिपूरला स्पर्श केला. नरेंद्र मोदींची तुलना त्यांनी रावणाशी केली. रावण ज्याप्रमाणे कुंभकर्ण आणि मेघनाद यांचंच ऐकत होता तसंच नरेंद्र मोदी करत आहेत, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. गांधी यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मी मणिपूरला जाऊ शकतो पण तुम्ही जाऊ शकत नाहीत. कारण तुम्ही मणिपूरमध्ये हिंदुस्थानाची हत्या केली. भाजपाचे लोक हे देशभक्त नाहीत तर देशद्रोही आहेत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
भारताचं लष्कर हे मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करु शकते. मात्र तुम्ही लष्कराला तिथे पाचारण करत नाही. कारण तुम्हाला मणिपूरमध्ये देश संपवायचा आहे.
राहुल गांधी, काँग्रेस नेते
नरेंद्र मोदी हे देशाचा आवाज ऐकत नाहीत. ते फक्त दोन लोकांचा आवाज ऐकतात. कोणाचं ऐकतात माहित आहे का? रावण दोघांचं ऐकायचा, मेघनाद आणि कुंभकर्ण. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी दोघांचंच ऐकतात एक अमित शाह आणि दुसरे अदाणी. लंका हनुमानाने जाळली नाही. लंका रावणाच्या अहंकारामुळे जळाली. रामाने रावणाला मारलं, रावणाच्या अहंकाराने मारलं. तुम्ही सगळ्या देशात आता केरोसीन फेकण्याचं काम करत आहात. आधी तुम्ही मणिपूरमध्ये केरोसीन फेकलं आणि आग लावली. आता तुम्ही हरियाणात तेच करत आहात. संपूर्ण देशात तुम्हाला हेच करायचं आहे. असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल यांचा फ्लाईंग किस
धगधगत्या मणिपूरवरून केंद्र सरकारचे वाभाडे काढणारे खासदार राहुल गांधी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. त्यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. आतापर्यंत कुठल्याही खासदाराने असं लज्जास्पद वर्तन सभागृहात केलं नव्हतं. राहुल गांधी यांच्या वर्तनाने आज शरमेने मान खाली गेल्याची टिप्पणी करत महिलांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधी यांना सभागृहात येण्याचा अधिकार आहे का? असा सवाल स्मृती इराणी यांनी केलाय.