मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखेची कामगिरी; प्रेम संबंधातून हत्या केल्याचे तपासात उघड
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमधील भिंगारी गावातील निर्जनस्थळी सहा महिन्यापूर्वी महिलेचा गळा दाबुन खून करून पळून गेलेल्या अज्ञात आरोपीला मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखा नवी मुंबई यांनी अटक केली आहे. पांडव गोरख जाधव उर्फ पांड्या ( 21) रा. मालधक्का झोपडपट्टी पनवेल असे या आरोपीचे नाव आहे.
भिंगारी गावच्या निर्जनस्थळी 10 ऑक्टोबर 2023 ला एका महिलेचा खून झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर पोलीस पथकाने तपास सुरु केला होता. तांत्रिक तपास व महिलेच्या संपर्कात असणार्या व्यक्ती व परिसरात राहत असणार्या व्यक्ती यांच्याकडील माहितीच्या आधारे व गुप्तबातमीदारांनी महिलेसोबत राहणारा अनोळखी इसम याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
त्यावरून महिलेचा गळा दाबून पसार झालेल्या इसमानेच तिचा खून केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले. पांडव गोरख जाधव हा (दि.29) मार्च ओरियन मॉल पनवेल येथे असल्याबाबतची माहिती पोलीस हवालदार महेश पाटील यांना मिळाल्याने मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने पांडव गोरख जाधव उर्फ पांड्या ( 21) याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडे सतत 7 ते 8 तास कसून चौकशी केली. तो गुन्हा घडल्यापासून स्वतःचे अस्तित्व बदलून महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये व गुजरात राज्यातील सुरत येथे राहत असल्याचे सांगून पांडवने गुन्हा केल्याची कबुली दिली. पांडव गोरख जाधव व मयत महिला यांचे प्रेमसंबध असून घटनेच्या दिवशी पांडव व मयत महिला यांच्यात दारू प्यायल्याने झालेल्या भांडणातून पांडव याने महिलेचा गळा दाबुन खुन केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.