। मुरूड । वार्ताहर ।
पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून शासनातर्फे करोडो रुपये खर्चून मुरूड-जंजिरा समुद्रकिनार्यावर सुशोभिकरण सुरू असल्याने नागरिक, पर्यटक सुखावले आहेत. मुरूड समुद्रकिनारी निवांत हवेशीर बसून सूर्यास्त, खळाळत्या लाटा आणि परिसराचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि पर्यटक येत आहेत. परंतु, या ठिकाणी अद्याप कोणतीही सुरक्षितता नसल्याने रात्रीच्यावेळी मद्यपींचा अड्डा बनतोय की काय, असे वाटायला लागले आहे.
मुरूड समुद्रकिनारी सुशोभिकरण काम अगदी अंतिम टप्प्यावर असून, नागरिक आणि पर्यकांसाठी निवांत गोलाकार बेंचची सुव्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटक शतपावली करीत येथे विसावत असतात. थंड वाहणारी हवा आणि प्रदूषणमुक्त हवामान यामुळे मनाला खूप समाधान वाटते. परंतु, नागरिकांना बसण्यासाठी तयार केलेल्या गोलाकार बेंचचा फायदा रात्रीच्या अंधारात दारू पिण्यासाठी काही मोकाट मद्यपी घेत आहेत, असे अनेकांना दिसून आले आहे. काही मद्यपी मंडळी रात्री 9 वाजता अंधारात येथे येऊन थंडगार हवा अंगावर घेत दारूचे पेग रिचवत आहेत. हा प्रकार सहजासहजी लक्षात येत नाही. सर्व सोपस्कार आटोपले की हेच मद्यपी याच ठिकाणी दारू पिऊन बिअरच्या आणि व्हिस्कीच्या बाटल्या चौथर्यावर सोडून निघून जातात, असे आढळून आले आहे. असा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कडक उपाययोजना केलेली नसल्याने असे प्रकार वाढतील, अशी भीती व्यक्त होत आहे. मुरुडच्या सुंदर समुद्रकिनार्यावर असा निर्लज्ज प्रकार रोखण्यासाठी आतापासून निर्बंध राखणे अत्यंत गरजेचे आहे. तरच येथील सुंदरता कायम राहील, अशी चर्चा मुरूडमध्ये ऐकायला मिळत आहे.