अरविंद गायकर यांच्या पाठपुराव्याला यश
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील प्रवाशांच्या सुविधेसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, मुरूड आगारातून मुरूड-बोरीवली रातराणी एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या या नव्या बससेवेचे स्वागत नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुरूड आगारातून रात्रीच्या वेळी मुरूड-बोरीवली एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी अरविंद गायकर यांनी महिनाभरापूर्वी राज्य परिवहन मंडळाच्या रायगड विभागीय नियंत्रक तसेच मुरूड आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत रायगड विभागीय नियंत्रक सुहास चौरे यांनी मुरूड आगार व्यवस्थापक राहुल शिंदे यांना मुरूड-बोरीवली रातराणी सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने काल रात्री सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांच्या हस्ते एसटी बसला पुष्पहार अर्पण करून या नव्या रातराणी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुरूड आगार व्यवस्थापक राहुल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर, कुणाल सतविडकर, चालक वसंत शिंदे, वाहक फिरोज शेख, शैलेश वारेकर तसेच उल्हास मकू उपस्थित होते.
तालुक्यातील अनेक नागरिक रोजगाराच्या निमित्ताने मालाड, गोरेगाव, बोरीवली, दहिसर, कांदिवली आणि इतर मुंबई उपनगरांमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच बोरीवली परिसरातील स्थानिक प्रवासी आणि पर्यटकांनाही या नव्या रातराणी एसटी सेवेचा मोठा फायदा होणार असल्याचे अरविंद गायकर यांनी सांगितले. दरम्यान, मुरूड आगारातून रात्री 10.30 वाजता मुरूड-बोरीवली एसटी सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे.
