मुरूड तालुका पुन्हा तापला

मोसमी पावसाची हुलकावणी

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

18 जूनचा दिवस उजाडला तरी मुरूड तालुक्यात मोसमी पावसाचे आगमन झालेले नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसून येत आहे. 10 जून रोजी अचानक पूर्व मोसमी विजेच्या गडगडाटासह कोसळला होता. त्या दिवशी रात्री तीन तासात 154 मिमी पाऊस पडल्याने तारांबळ उडाली होती. वीज पुरवठा 15 तास खंडित झाला होता. हवेत काहीसा थंडावा आला होता. पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी भात पेरणी करून घेतली. त्यानंतर पावसाने सतत हुलकावणी दिल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

परंतु, गेल्या आठ दिवसात मोसमी पाऊस अद्याप सुरू झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस नसल्याने मुरूड तालुका पुन्हा तापला आहे. तापमान 31 ते 32 पर्यंत गेले असून घामाच्या धारा कपाळावरुन वाहत आहेत. मेघगर्जनेसह पाऊस पडणार असे मेसेज हवामान खात्याकडून येत असले तरी गेल्या 8 दिवसात पावसाचा पत्ता नाही. भात पेरणी केलेल्या पिकासाठी पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बांधव पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

Exit mobile version