माथेरानमध्ये माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान गिरीस्थान नगरपरिषदतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली. शहरातील सर्व नागरिक आणि विद्यार्थी यांनी आपल्या शहराला स्वछ ठेवण्यासाठी स्वच्छता शपथ घेतली. तसेच शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छता मशाल फेरी काढून अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात माथेरान गिरीस्थान नगरपरिषद कडून मोठी कामगिरी करण्यात आली आहे. माथेरान नगरपरिषदने या स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये या अभियानात पश्‍चिम विभागात 15 व क्रमांक पटकावला होता. यावर्षी देखील स्वच्छतेच्या बाबतीत कायम पुढे असणार्‍या माथेरान शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी तयारी सुरू केली असून राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियान मध्ये देखील माथेरान नगर परिषदेने माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत _स्वच्छोत्सव 2023 साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरात जनजागृती करणारे फलक लागले आहेत. दररोज कचरा उचलले जाणारे आघाडीचे शहर म्हणून माथेरानची ओळख आहे.

पर्यटन स्थळ असल्याने माथेरान गीरिस्थान नगरपरिषद कडून या दोन्ही अभियानाची सुरुवात पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या अध्यक्षतेखाली अभियानाला सुरुवात झाली आहे. त्यात स्वच्छता मशाल रॅली, जनजागृती यात्रा, स्वच्छता शप्पथ आदी कार्यक्रमाचे आयोजन पालिकेकडून करण्यात आलेले होते. स्वच्छतेमधील सहभागापासून ते महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छतेमध्ये झालेले संक्रमण साजरे करणे हे स्वच्छोत्सव 2023 चा उद्देश ठेवण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023आणि माझी वसुंधरा अभियान निमित्त आयोजित स्वच्छ्ता शपथ घेण्यासाठी माथेरान मधील वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, प्राचार्य गव्हाणकर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी यांच्यसह माथेरान शहरातील नागरिक यांचा सहभाग होता. यावेळी पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक कल्पना पाटील, ढेबे तसेच पालिकेचे अधिकारी अभिमन्यु येळवंडे, नरेंद्र सावंत, प्रविण सुर्वे, अन्सार महापुळे, ज्ञानेश्‍वर सदगीर आणि शहरातील महिला बचत गट आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा सहभाग होता. अभियानाचे निमित्ताने विद्यार्थी नागरिक आणि पालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य विभाग यांचे कर्मचारी यांनी जनजागृती रॅली काढली. त्याआधी पालिकेच्या आवारात स्वच्छता शपथ घेण्यात आली आणि नंतर शहरात स्वच्छता मशाल फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

Exit mobile version