24 तासांत दोन आरोपी जेरबंद
। रसायनी । प्रतिनिधी ।
ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावच्या हद्दीत दरीमध्ये बेवारस अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत दोन संशयित आरोपींना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेतले.
माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि.25) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाट परिसरातील मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत पुणे-माणगाव मार्गालगत दरीमध्ये 25 ते 30 वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बुधवारी (दि.26) रात्री माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. ही कारवाई सपोनि मानसिंग पाटील, पोसली सुरज पाटील, पोस ई नरेश निंबाळकर, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, विनोद पाटील, अमोल हंबीर, रुपेश निगडे, रविंद्र मुंढे, प्रतिक सावंत, शाम खराडे, रणजितसिंग खराडे, मनोहर शिरतार, अक्षय पाटील, सचिन वावेकर, सागर थळे, प्रशांत लोहार, प्रदिप खरात, अक्षय जगताप, तुषार घरत यांच्या पथकाने कारवाई केली.
तपासादरम्यान मृत महिलेची ओळख सुमन गोपाल यादव, रा. चिखली, पुणे, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश अशी पटली. त्यानंतर तिच्याबाबत अधिक माहिती मिळवून तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा माग काढण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमधून दोघे ताब्यात
या प्रकरणात पोलिसांनी दुर्गाप्रसाद मंगालप्रसाद प्रजापती (24) आणि दिनेशकुमार बिसराम प्रजापती (27) या दोघांना पिंपरी-चिंचवड परिसरातून तपासासाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत, दोन्ही आरोपींनी महिलेला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात नेले. तेथे ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून करून मृतदेह घाटातील दरीत टाकल्याचे आरोपींनी सांगितले.
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.
तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच सायबर सेलच्या पथकाने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास, माहिती संकलन आणि जलद कारवाईच्या माध्यमातून अवघ्या एका दिवसात खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
