। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव – पुणे रस्त्यावर पुण्याहून माणगावकडे येणाऱ्या फोक्स वॅगन कंपनीच्या कारवर डोंगरातून एक भला मोठा दगड पडल्याने कारमधील एका 43 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना गुरुवारी (दि.30) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून माणगावकडे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गुजराती कुटुंब कारने येत असताना त्यांची गाडी ताम्हिणी घाटात माणगावजवळील कोंडेथर गावच्या हद्दीत आली असता डोंगरातून एक भला मोठा दगड कारवर पडला. तो दगड कारमध्ये बसलेली महिला स्नेहल गोविंदास गुजराती (43) रा.पिंपळी चिंचवड पुणे यांच्या अंगावर पडल्याने त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचा मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल झाले. तसेच माणगाव शहरातील गुजराती कुटुंबीय यांचे नातेवाईक व मित्रपरिवार यांनी उपजिल्हा रुग्णायात धाव घेऊन या अपघाताबाबत हळहळ व दुःख व्यक्त केले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, अधिक तपास माणगाव पोलीस करीत आहेत.






