सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी पोलिसांच्या ताब्यात
। नेरळ । प्रतिनिधी |
कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या सुटकेस बॉडीचे गूढ अखेर 25 दिवसांत उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. तपास पथकाने तब्ब्ल 200 ते 250 सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात एका महिलेचाही समावेश असून मृत महिला आणि आरोपी हे मित्र असल्याचे समोर आले आहे. व्ही. विजयकुमार व्यंकटेश आणि टी. यशस्विनी राजा असे दोघा आरोपींची नावे असून मृत महिलेचे नाव धनलक्ष्मी यरप्पा रेड्डी असे समोर आले आहे. हे तिघेही मुंबई आणि बेंगळुरू येथे नोकरीच्या शोधात होते.
16 एप्रिल रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर कर्जतजवळील ठाकूरवाडी स्टेशन परिसरात गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. 15 एप्रिल रोजी आरोपी व्ही. विजयकुमार व्यंकटेश व टी. यशस्विनी राजा ही महिला लोकमान्य टिळक टर्मिनल फलाट क्रमांक चारवर आले. यावेळी सुटकेस घेऊन जाताना ते बळाचा वापर करत असल्याचे लक्षात आल्याने हेच आरोपी असावे अशी दाट शक्यता निर्माण झाली. दरम्यान, बंगळुरू स्थानकात व्यंकटेश व टी. यशस्विनी बॅगशिवाय उतरल्याचे पोलिसांना दिसून आल्याने त्यानुसार तपासाची चक्रे फिरवण्यात आली. तसेच, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामागे काय उद्देश होता, खून पूर्वनियोजित होता का, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
जिल्हा पोलिसांकडून बक्षीस जाहीर
मृत महिला धनलक्ष्मी ही अविवाहित होती. ती मूळची आंध्र प्रदेशातील हंमप्पा पुरम रायपाडू रायताडू येथील रहिवासी होती. आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप फड, पोलीस शिपाई श्रीकांत, पोलीस शिपाई बेंद्रे, शिपाई वांगणेकर, वाघमारे, दवणे यांनी खुनाचा तपास लावण्यात मोठे यश मिळविले. या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पथकातील पोलिसांना 20 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.