नागाव, म्हातवली बेरोजगार संघटनेचे उपोषण

लेखी आश्‍वासानाशिवाय मागे न हटण्याचा संघटनेचा निर्धार
सर्वच राजकीय पक्षांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील नागाव म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत ओएनजीसी हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे. उरण नागाव ओएनजीसी प्रकल्पामध्ये गेले काही वर्ष सातत्याने विविध कंत्राटाद्वारे नोकर भरती होत असताना नागाव म्हातवली येथील प्रकल्पग्रस्त, बेरोजगारांना जाणून बुजून डावलले जात आहे. सुमारे 500 एकर जमीन संपादित होऊन अनेक वर्षे झाले. प्रकल्प सुरु होऊन अनेक वर्षे होऊन आजही गावातील सुशिक्षित बेरोजगार ओएनजीसीतील नोकरी पासून वंचित आहेत. बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांच्या या महत्वाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेतर्फे सोमवारी उरण तालुक्यातील ओएनजीसी कंपनी गेट समोर उपोषण सुरु झाले आहे.

स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढत असलेल्या नागाव, म्हातवली बेरोजगार संघटनेचे बेमुदत आंदोलनचा सोमवारी पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांचा, सामाजिक संघटनेचा बेरोजगार युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहायला मिळाला. द्रोणागिरी भवन, ए पी यु गेट, ओएनजीसी गेट जवळ सुरु असलेल्या या बेमुदत आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, शेकापचे ज्येष्ठ नेते काका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गणेश नलावडे, काँग्रेस पक्षाचे उरण तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय म्हात्रे, शिवसेना पश्‍चिम विभाग प्रमुख एस के पुरो, रायगड जिल्हा मनसे संघटक रामदास पाटील, आदी विविध पक्षातील पदाधिकार्‍यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेत आपला जाहीर पाठींबा दिला.

नागाव म्हातवलीतील सर्व बेरोजगारांना ओएनजीस कंपनीत काम मिळावे, ओएनजीस कंपनीत, प्रकल्पात नागाव म्हातवलीतील बेरोजगारांना कॉन्ट्रॅक्ट मिळावे अशी आमची प्रमुख मागणी असून जोपर्यंत याबाबतीत आम्हाला ओएनजीस कंपनी प्रशासनाकडून लेखी पत्रक मिळत नाही. तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही असाच पुढे सुरु ठेऊ. उद्या जर कोणाचे बरे वाईट झाले तर त्या परिणामास सर्वस्वी ओएनजीस प्रशासनच जबाबदार राहील असा आक्रमक इशारा नागाव, म्हातवली बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी ओएनजीस प्रशासनाला दिला आहे.

Exit mobile version