‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ अभियान; विविध प्रकारच्या कचऱ्याचे संकलन
| रेवदंडा | प्रतिनिधी |
जागतिक ओझोन दिनानिमित्त आयआयटीएम पुणे आणि अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर 5.0’ या उपक्रमांतर्गत नागाव समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनारी जमा झालेला विविध प्रकारचा कचरा स्वयंसेवकांनी गोळा करून किनारा स्वच्छ केला. मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आल्याने समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेबरोबरच कचरा व्यवस्थापनाचे महत्त्वही अधोरेखित झाले.
या अभियानात नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्यासह आयआयटीएम पुणे टीम, ग्रामपंचायत स्वच्छता व कचरा व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी हर्षदा मयेकर यांनी, “स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार नागरिकत्व ही केवळ एखाद्या स्वच्छता अभियानापुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
तसेच, किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या अनुप महाजन व आयआयटीएम पुणे टीमचे आभार मानण्यात आले. प्रत्येक स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेणाऱ्या ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व कचरा व्यवस्थापन पथकाचे अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर “वारंवार स्वच्छता अभियान राबविण्याची गरजच भासू नये, अशी सामूहिक जबाबदारीची भावना प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण झाली पाहिजे. नागावचे समुद्रकिनारे सदैव स्वच्छ राहावेत, हेच आपले सामूहिक स्वप्न असावे,” असा संदेश देखील यावेळी देण्यात आला. या उपक्रमामुळे समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.






