पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करणार
| सुधागड-पाली | प्रतिनिधी ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरात नगरपंचायत तर्फे नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व गटारे आणि नाले सफाईची ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. परिणामी पालीत पावसाळ्यात गटारे व नाले तुंबण्याचा धोका राहणार नाही.
पाली नगरपंचायत कार्यालयात मान्सूनपूर्व कामांची तयारी व नियोजन बैठक नगराध्यक्ष पराग मेहता उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानुसार पाली शहरातील सर्व मुख्य नाले व अंतर्गत गटारे यांचे सफाई व दुरुस्ती काम युद्ध पातळीवर चालू आहे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वापरून चांगल्या पद्धतीने नालेसफाई करण्यात येत आहे.
ठरलेल्या नियोजनाद्वारे येथील वेगवेगळ्या ठिकाणची नालेसफाई टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल. बांधकाम साहित्य यामध्ये वाळू व रेती, पाणी बॉटल, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा व गाळ यामुळे येथील बहुसंख्य ठिकठिकाणी नाले व गटारे तुंबली आहेत. ते सर्व काढून नालेसफाई होत आहे. नगरपंचायत चे सफाई कर्मचारी नियमित नालेसफाई करतात. पावसाळ्यापूर्वी होत असलेली नालेसफाई ही अत्याधुनिक यंत्र व जेसीबीच्या साह्याने अधिकची माणसे घेऊन करण्यात येत आहे. याबरोबरच गटारे व नाल्याभोवती उगवलेले गवत, झाडे झुडपे देखील काढली जात आहेत. त्यामुळे या तुंबलेली गटारे व नाले पूर्णपणे साफ केली जात आहेत. तसेच नालेसफाई सुरुवात झाल्याने दुर्गंधी व घाण सर्व समस्या काही दिवसांत मार्गी लागणार आहेत.
पाली नगरपंचायत तर्फे मान्सूनपूर्व कामांचे योग्य नियोजन केले असून मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वापरून सर्व प्रभागातील कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण केली जातील. नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी गटारे व नाल्यामध्ये घरातील कचरा, प्लास्टिक कचरा किंवा बांधकाम साहित्य टाकू नये.
सुलतान बेनसेकर,
उपनगराध्यक्ष, पाली
