शेतकरी-व्यापाऱ्यांच्या नुकसानीवर सरकारवर टीका
| उरण | प्रतिनिधी |
काँग्रेस नेते, आमदार नाना पटोले यांनी जेएनपीए बंदराला भेट देत आयात-निर्यातीवर झालेल्या परिणामाचा आढावा घेतला. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मागील अनेक दिवसांपासून हजारो कंटेनर बंदरात अडकून पडले असल्याची माहिती समोर आली. याबाबतचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत केंद्र सरकार आणि राज्यसरकारवर पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, संपूर्ण प्रकाराबाबत सभागृहात मुद्दे मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जवाहारलाल नेहरू प्राधिकरण (जेएनपीए) प्रशासन आणि सीमाशुल्क विभागामार्फत अडकलेले कंटेनर निर्यातदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बंदर प्रशासनाने दिली. या पार्श्वभूमीवर नाना पाटोले यांनी बंदरातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. जेएनपीए प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी पटोले यांनी बंदर संचालित पार्किंगला भेट देत तेथील कंटेनर आणि संबंधित व्यापाऱ्यांशी भेट घेत चर्चा केली. जेएनपीए प्रशासनाकडून माहिती घेत असताना, पाटोले यांनी जेएनपीए प्रशासन माहिती लपवत असल्याचा आरोप केला आहे. आयात-निर्यातीवर झालेल्या परिणामाची माहिती बाहेर येऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, हे दुर्लक्षित करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. या युद्धजन्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट होत असून, या परिस्थितीस केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचे परखड मत नाना पाटोले यांनी पाहणीदरम्यान ‘कृषीवल’शी बोलताना व्यक्त केले. एकंदरीत, आखाती देशामधील परिस्थितीमुळे भारतीय व्यापारावर परिणाम झाला असून, हजारो कंटेनर माल बंदरामध्ये अडकून राहिला आहे. यामध्ये फळं, भाज्या, मास यासारखे नाशिवंत माल मोठ्या प्रमाणात असल्याने येथील व्यापारी, निर्यातदार आणि शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. निर्यात होणारा माल पिकवण्यासाठी शेतकऱ्याला मेहनत, मशागत आणि खर्च मोठा असतो. यातून अशा प्रकारची उद्भवलेली आपत्ती पाहता शेतकरी देशोधडीला लागला आहेच, व्यापारी आणि निर्यातदार यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्तांना भरापाई मिळाली पाहिजे, आशी भूमिका यावेळी पटोले यांनी मंडली आहे.







